पुणे आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या घवघवीत यशाबद्दल माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे तसेच पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचेही अभिनंदन करून शाळा स्थापनेपासून आजपर्यंत सलग शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल घोषित करत सीबीएसईने सरप्राइझ दिले आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या पुढाकाराने आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु केलेल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने यंदाही निकालात बाजी मारली आहे.सलग पाच वर्षे इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.सर्वांनी उत्तम गुण प्राप्त करीत स्कुलचे नाव उज्ज्वल केले आहे. सृष्टी चिंतल हिला ८७ टक्के तर आदर्श दोंतुल ८२. ८ टक्के , प्रियंका मिसाळ ८२ .६ टक्के असे गुण मिळवून यश मिळवले आहे. यापूर्वी या शाळेतून जेइइमेन्स मध्ये तसेच आयआयटीमध्ये विद्यार्थी टॉपर आले आहेत. तर नासासाठी विद्यार्थ्यांचीही निवड झालेली आहे. या यशाबद्दल बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, गरीब वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या शाळेची स्थापना आठ वर्षांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून झाली. प्रत्येक परीक्षेत निकालाची शंभर टक्के परंपरेमुळे ही शाळा नावारूपास आली आहे. इयत्ता दहावीचे वर्ग सुरु होऊन आज सलग पाच वर्षे निकाल शंभर टक्के लागत आहे.सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो मात्र या शाळेसाठी ज्या – ज्या बाबी आवश्यक आहेत,कायमस्वरूपी शिक्षकांचा प्रश्न याकडे आता पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. जेणेकरून आणखी घवघवीत यश मिळेल असेही आबा बागुल यांनी नमूद केले.