ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत .
विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. विद्या बाळ यांनी 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या मासिकाद्वारे त्यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाज प्रबोधन केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे 1964 ते 1983 या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले.
लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रात स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्य सुरु केले. ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली. या माध्यमातून त्यांनी समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले.
विद्याताईंचे स्त्री सक्षमीकरणातील योगदान सदैव स्मरणात राहील-अजित पवार*
मुंबई दि. ३० जानेवारी -. स्त्री सक्षमीकरण चळवळीतील विदयाताईंचे योगदान सदैव स्मरणात राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ साहित्यिक, कृतीशील संपादक, स्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विद्याताईंच्या सामाजिक कार्याशी जोडला गेल्याने त्यांची तळमळ मी प्रत्यक्ष अनुभवली आहे असेही अजितदादा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
दिवंगत विद्याताई स्त्री हक्क चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या होत्या. शहरेच नव्हे तर ग्रामीण भागात, गावखेड्यांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचलं होतं. समाजातील सर्व घटकांमधील स्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवनभर विधायक संघर्ष केला असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षणसंस्था विद्याताई व सहकाऱ्यांनी पदरमोड करुन १९५१ मध्ये उभी केली, वाढवली, त्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मलाही मिळाली असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विद्याताईंनी अनेक संस्था व माणसं कष्टपूर्वक उभी केली. त्यांनी ‘नारी समता मंच’ संघटनेच्या माध्यमातून गावोगावी नेलेलं ‘मी एक मंजुश्री’ हे प्रदर्शन स्त्री हक्क चळवळीतील आश्वासक टप्पा होता. राज्यातील महिलांना संघटीत, हक्काविषयी जागरूक, सक्षम करणं हीच विद्याताईंना श्रध्दांजली ठरणार आहे असेही शेवटी अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.